पाटाळा रिठ नदीत जवानाचा बुडून मृत्यू
मित्रांसोबत पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील पाटाळ – राळेगाव येथील रिठ नदी पात्रात पोहत असताना एका जवानाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विजय औंकार काळे (वय ३०) रा. दहेगाव, ता. यावल, जि. जळगाव, हल्ली मुक्काम विनायक नगर, माजरी असे मृत जवानाचे नाव असून तो महाराष्ट्र सुरक्षा सेनेत कार्यरत होता.
माहितीनुसार, विजय काळे हा आपल्या मित्रांसोबत मंगळवारी (दि. २६) दुपारी पाटाळा रिठ नदी पात्रावर गेला होता. विजय हा नेहमी या नदी पात्रात पोहण्यासाठी जात असल्याने त्याला नदीची माहिती होती. दरम्यान, नदीतील एका धडीवरून दुसऱ्या धडीकडे त्याचे मित्र पोहत गेले. त्यानंतर विजय काळे हाही त्यांच्या मागून पोहत दुसऱ्या धडीकडे जात होता.
यावेळी अचानक तो खोल पाण्यात जाऊ लागला. विजय बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आणि तो खोल भागात गेल्याने मित्रांना त्याला बाहेर काढता आले नाही. काही क्षणातच तो पाण्यात बेपत्ता झाला.
घटनेची माहिती मिळताच माजरी पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आली. रात्री उशीर झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती. बुधवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास विजय काळे याचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना आढळून आला.
या घटनेमुळे माजरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास माजरी पोलीस करीत आहेत.



