ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मक्याच्या पाचटामुळे उसाला झळ; वादातून दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल

सिनगाव जहागीरमध्ये शेतजमिनीच्या वादातून हाणामारी; देऊळगाव राजा पोलिसांत क्रॉस तक्रारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा: तालुक्यातील सिनगाव जहागीर शिवारात मक्याच्या पाचटाला आग लावल्यामुळे शेजारील उसाच्या पिकाचे नुकसान झाल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळून आला असून या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवीगाळ, मारहाण, धमक्या आणि अश्लील वक्तव्यांचे आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस माहितीनुसार, कायमी अप क्रमांक २२७/२०२६ अंतर्गत सौ. यशोदा शिवहरी नागरे (वय ४३, रा. सिनगाव जहागीर) यांच्या तक्रारीवरून डिंगाबर विठोबा नागरे, मनिषा डिंगाबर नागरे, परेश गणेश वाघ व गयाबाई विठोबा नागरे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २० मे रोजी सकाळी शेतातील मक्याचे पाचट पेटवण्यात आले असता जोरदार वाऱ्यामुळे शेजारील उसाच्या पिकाला काही प्रमाणात झळ पोहोचली. या कारणावरून झालेल्या वादात आरोपींनी कपडे फाडून अश्लील शिवीगाळ केली, केस ओढून मारहाण केली तसेच फिर्यादीच्या मुलाच्या हाताच्या बोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीव मारण्याच्या धमक्याही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी कायमी अप क्रमांक २२८/२०२६ अंतर्गत सौ. मनिषा डिंगाबर नागरे (वय २७) यांनी शिवहरी बाबुराव नागरे, यशोदा शिवहरी नागरे आणि सार्थक शिवहरी नागरे यांच्याविरुद्ध प्रतितक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार, मक्याच्या पाचटामुळे उसाचे नुकसान झाल्याचा जाब विचारल्यानंतर आरोपींनी घरात येऊन अश्लील वक्तव्ये करत शिवीगाळ केली, काठीने मारहाण केली, केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीव मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोन्ही तक्रारींमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हे नोंदविण्यात आले असून पोलीस हवालदार माधव कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सिनगाव जहागीर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये