पत्रकारावरील हल्ल्याच्या देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगावराजा :- मातोश्री सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील रेतीघाटावर वृत्तांकनासाठी गेलेले पत्रकार रामदास मानसिंग कहाळे यांना रेतीमाफियांनी कथितरित्या मारहाण केली तसे दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रेतीमाफियांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करुन या रेतीमाफियांना त्वरित अटक करण्यात यावी व त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे मागणीवजा निवेदन देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले.
संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
१९ मे २०२६ रोजी पत्रकार रामदास कहाळे हे राहेरी (ता.सिंदखेडराजा) येथील रेतीघाटावर वृत्तांकनासाठी गेले असता तेथील वाळू वाहतूक कंत्राटदाराच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या गळ्यात दोरी लावून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे.
संबंधित आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे
पत्रकार रामदास कहाळे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
या निवेदनावर देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, कार्याध्यक्ष गणेश डोके, सचिव सुरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके, प्रा.अशोक डोईफोडे, संतोष जाधव, शिवाजी वाघ, किरण वाघ, शेख कदीर, परमेश्वर खांडेभराड, मुन्ना ठाकूर, राहुल नायर, संतोष वासुंबे, राजू खांडेभराड, अशोक जोशी, उषा डोंगरे, प्रभाकर मांटे, राजेश खांडेभराड, मुबारकशहा, दत्ता हांडे आदींच्या सह्या आहेत.



