नवतपादरम्यान आरोग्याला जपणे आवश्यक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहरातील तापमान हे सातत्याने अधिक राहत आहे, त्यातच मे महिन्यात नवतपा येतो, यंदा २०२६ मध्ये, हा कालावधी २५ मे ते २ जून या दरम्यान असण्याची शक्यता आहे.त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असुन अश्या वातावरणात आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः नवतपा सुरु असतांना नऊ दिवस पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते व उष्णतेचा पारा सर्वाधिक असतो.त्यामुळे उष्णतेपासुन संरक्षण करण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती आरोग्य विभागातर्फे करण्यात येते. यंदा मान्सुनच्या लवकर आगमनाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे मात्र कडक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेणे योग्य राहते.
उष्माघाताचा विशेष धोका कुणाला – ५ वर्षापेक्षा कमी व ६५ वर्षावरील नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर,प्राणी,मद्यपान, धूम्रपान करणारे,शुगर,डायबिटिजचे रुग्ण यांना उष्माघाताचा विशेष धोका असतो.
उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे : तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर. एस., घरी बनवलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.
अशक्तपणा, संथपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्त जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
काय करू नये : लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेले व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नये. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी व उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेट थंड पेय घेऊ नये.



