ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुकेश जिवतोडे यांच्या पाठपुराव्याला यश

कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या निर्देशानंतर भद्रावतीचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ तालुक्यातील मौजा कुरोडा येथील शेतकरी दिवंगत परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या ४८ दिवसांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर राज्याचे कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

परमेश्वर मेश्राम यांनी त्यांची शेती धानोरकर कुटुंबाला विकली होती. त्याबदल्यात देण्यात आलेले धनादेश (चेक) अनादरित (बाऊन्स) झाले. त्यानंतर न्यायालयाने संबंधित जमीन परमेश्वर मेश्राम यांना परत करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही जमिनीचा फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून परमेश्वर मेश्राम यांनी वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा मारल्या. मात्र, प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने त्यांनी भद्रावती तहसील कार्यालयाच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या वतीने न्यायासाठी आंदोलन छेडण्यात आले. समितीचे समन्वयक राजू कुकडे, वंदना मेश्राम व स्वप्नील मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४८ दिवस आंदोलन सुरू होते. विविध सामाजिक, राजकीय व कामगार संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

आंदोलनादरम्यान शिवसेना चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची बाजू जाणून घेतली. त्यांनी राज्याचे कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याशी आंदोलनकर्त्यांची व्हिडिओ कॉलद्वारे थेट चर्चा घडवून आणली. तसेच या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची दखल घेत कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी ५ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित निवेदनाची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तपास प्रक्रियेला गती मिळाली आणि तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

तहसीलदार व नायब तहसीलदारांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून, या प्रकरणातील संपूर्ण तपास निष्पक्षपणे पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अन्याय निवारण संघर्ष कृती समितीने केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये