ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोना काळापासून ट्रस्ट सातत्याने समाजहिताचे कार्य करत असून गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम : आ. देवतळे

रविंद्र शिंदे ट्रस्टने स्वीकारले अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

‘स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना’ अंतर्गत ६२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भद्रावती :_ समाजातील गरजू, वंचित आणि निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने आमदार करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथील शिवनेरी कार्यालयात सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ‘स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना’ अंतर्गत चार अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले, तर यापूर्वी ट्रस्टकडून शैक्षणिक दत्तक असलेल्या ६२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुंज आश्रम, मोझरीचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मणकाका गमे होते. प्रमुख अतिथी म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त रविंद्र शिंदे, बँकेचे संचालक जयंत टेमुर्डे, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे तसेच वेदांती करण देवतळे उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत किसान विद्यालय, माढेळी येथील अश्लेषा जाम्बवंत वैद्य (इयत्ता १० वी), श्रावणी किशोर पावडे (इयत्ता १० वी), सुहाणी किशोर पावडे (इयत्ता ६ वी) आणि सोहम प्रकाश टिपले (इयत्ता ९ वी) या अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ट्रस्टने अधिकृतपणे स्वीकारून त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली.

यावेळी बोलताना आमदार करण देवतळे म्हणाले की, कोरोना काळापासून ट्रस्ट सातत्याने समाजहिताचे कार्य करत असून गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम करीत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या ट्रस्टचे त्यांनी कौतुक केले. या जनहितार्थ सुरू असलेल्या उपक्रमांना शासन स्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला किशोर बावणे, प्रा. रुपलाल कावडे, देवीदास कष्टी, राजूमामा मिश्रा, संतोषी जीवतोडे, सोमेश्वर नागमोते यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कमलाकर पावडे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयश्री फाले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला. ट्रस्टच्या या संवेदनशील व समाजोपयोगी उपक्रमाचे वरोरा तालुक्यात सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये