‘झाडीपट्टी’चा लोककला अनुदान पॅकेजमध्ये समावेश
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात चालणाऱ्या ‘झाडीपट्टी’ या नाट्यकलेचा महाराष्ट्र शासनाच्या लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान सभेत केली.
महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला असून लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून लोकप्रबोधन, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे. या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन विविध लोककला महोत्सव आयोजित करत असून लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदानही देत आहे.
सन २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत नव्याने ‘विदर्भातील ‘झाडीपट्टी’ या नाट्यकलेचा लोककला म्हणून समावेश करण्यात आला आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील १३० वर्षांहून अधिक परंपरा असलेली वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्य परंपरा आहे. दिवाळीच्या शुभ पर्वावर चालणारी ही लोककला होळीपर्यंत नियमित सुरू असते. ज्यामधून शेकडो कलाकारांसह इतर तांत्रिक, साहाय्यकांचा समावेश राहत असून, या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते.
*लोककलेत या कलांचाही समावेश*
विदर्भातील झाडीवूड म्हणून ओळख असलेल्या झाडीपट्टीसह वहिगायन, नमन खेळे आणि जाखडी या लोककलांचाही समावेश अनुदान पॅकेजमध्ये करण्यात आला आहे. वहीगायन ही धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील लोकप्रिय लोककला असून, नमन खेळे आणि जाखडी या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत.
*असे मिळणार अनुदान*
या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे प्रत्येकी १० लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार, झाडीपट्टीतील २० कलापथकांना एकूण १० लाख रुपये, वहीगायनतील २० कलापथकांना एकूण १० लाख रुपये, नमन खेळेतील २० कलापथकांना एकूण १० लाख रुपये तर जाखडीतील २० कलापथकांना एकूण १० लाख रुपये असे अनुदान देण्यात येणार आहे.



