ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध धंद्यांविरोधातील तक्रारींचा सूड?

भाजप नगरसेवक सुरज पांडे यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर : नगर परिषदेचे नगरसेवक सुरज रामभवन पांडे यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र तसेच चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नगरसेवक पांडे यांनी म्हटले आहे की, नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर गडचांदूर शहरातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका, जनावरांची अवैध तस्करी तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात त्यांनी सातत्याने लेखी व तोंडी तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींवर प्रभावी कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडून आपल्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यानंतर सूडबुद्धीने विविध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय, पूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणातील व्यक्तीविरुद्ध बनावट कागदपत्रांबाबत तक्रार केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्या व्यक्तींकडून वैयक्तिक वैमनस्य निर्माण झाले असून, काही पोलीस अधिकारी आणि संबंधित व्यक्तींनी संगनमत करून आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

दि. ७ जुलै २०२६ रोजी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी, कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आदी महत्त्वाचे पुरावे तातडीने जप्त करून त्यांची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच, आपल्या विरोधातील तडीपार प्रस्ताव, दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि आपण केलेल्या अवैध धंद्यांच्या तक्रारी या सर्व बाबींची एकत्रित चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

चौकशी सध्या संबंधित ठाणेदारांकडे न ठेवता वरिष्ठ व निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावी. तसेच चौकशीदरम्यान कोणताही दबाव आणला जाऊ नये किंवा आणखी खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत, यासाठी आवश्यक संरक्षण देण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, चौकशीत स्वतःकडून कोणताही गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास स्वतःवर कायद्यानुसार कारवाई स्वीकारण्याची तयारी असल्याचेही सुरज पांडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पोलीस अधिकारी आणि दोषी व्यक्तींवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये