हिंदू स्मशानभूमीतील शवदाहिनी तत्काळ दुरुस्त करा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्याधिकारीकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील आमना नदीच्या काठावरील हिंदू स्मशानभूमीतील शवदाहिन्यांची (पिंजरे) अत्यंत दैयनीय अवस्था झाली असून प्रेतावर अंत्यसंस्कार करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे तुटलेल्या व जीर्ण झालेल्या शवदाहिनी पिंजरे तत्काळ दुरुस्त करा,अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना दिला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,आमना नदीच्या काठावरील हिंदू स्मशानभूमीतील तीन शवदाहिनी – पिंजरे हे खूप खराब होऊन जीर्ण झाले आहे.शवदहिण्याच्या अत्यंत दुरावस्थेमुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास अडचण निर्माण होत आहे. हिंदू स्मशानभूमीतील शवदहीन्यांची दुरावस्था ही केवळ धार्मिक किंवा सामाजिक अस्मितेचा भाग नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आणि मानवी सन्मानाचा अत्यंत गंभीर विषय आहे. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सोय – सुविधा देणे हे नगरपरिषद चे कर्तव्य आहे.
मात्र हिंदू स्मशानभूमीतील तुटलेल्या व जीर्ण झालेल्या शवदाहीण्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना प्रेताची विटंबना होऊ शकते. माणसाला जिवंतपणे सन्मान मिळणे जितके गरजेचे आहे, तितकास माणसाचा अंतिम प्रवासही हा त्याचा कायदेशीर आणि सामाजिक अधिकार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या धार्मिक व सामाजिक भावना लक्षात घेता हिंदू स्मशानभूमीतील तुटलेल्या व जीर्ण झालेल्या शवदहिनी – पिंजरे तात्काळ दुरुस्त करण्यात यावे,अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, नगरसेवक ऍड,रामेश्वर रामाने, नवनाथ गोमधरे, अशोक पाटील, शहराध्यक्ष विष्णू रामाने आदींनी दिला आहे.



