ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सर्वांगीण आधुनिकीकरणासाठी डीपीआर तयार होणार

आ. सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

चांदा ब्लास्ट

महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आगीच्या घटनेनंतर जुन्या पायाभूत सुविधांबाबत विधानसभेत आ.मुनगंटीवार यांनी उपस्थित केला गंभीर मुद्दा

रस्ते, कर्मचारी निवासस्थाने आणि अन्य सुविधांच्या नूतनीकरणासाठी डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई – चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अलीकडील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण आधुनिकीकरणाचा मुद्दा राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केला. अग्निशमन विभागाच्या नोंदवहीनुसार आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी ३२ मिनिटांत घटनास्थळी पोहोचली, मात्र विद्युत केंद्र परिसरातील अरुंद व खड्डेमय रस्ते, कालबाह्य झालेल्या यंत्रणा आणि जीर्ण झालेली कर्मचारी निवासस्थाने यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक त्या सर्व कामांसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी घोषणा सभागृहात केली.

सभागृहात बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र उभारून सुमारे ४५ ते ४६ वर्षे झाली असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध संच उभारण्यात आले. त्या काळातील पायाभूत सुविधा आता कालबाह्य झाल्या आहेत. अग्निशमन विभागाने वेळेत प्रतिसाद दिला असला, तरी परिसरातील अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. भविष्यात अशा प्रकारची आग अधिक व्यापक स्वरूप धारण केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी आ.मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरालगत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल असल्याने भविष्यात असा प्रकार समोर झाला तर आग पसरल्यास पर्यावरण आणि वनसंपदेवरही गंभीर परिणाम होऊ शकतात, असे सांगत त्यांनी संपूर्ण महाऔष्णिक विद्युत केंद्रातील रस्ते, इतर पायाभूत सुविधा तसेच कर्मचारी निवासस्थानांचे तातडीने नूतनीकरण करण्यासाठी डीपीआर तयार करून शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

तसेच, विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेली निवासस्थाने अत्यंत जुनी झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी या निवासस्थानांचेही पुनर्बांधणी किंवा नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा असल्याचे मान्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित आग ही कन्व्हेयर बेल्टच्या मार्गावरील परिसरात लागली होती. सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही, मात्र या घटनेने तेथील जुन्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अनेक पायाभूत सुविधा कालबाह्य झाल्या असून त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीनुसार आवश्यक त्या सर्व बाबींचा सविस्तर डीपीआर तयार करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रस्ते, यंत्रणा, कर्मचारी निवासस्थाने आणि इतर आवश्यक सुविधांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सुरक्षिततेसह तेथील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये