ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोदावरी मेडिकल चोरट्यांनी फोडले

32 हजारांची रोकड लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील उंबरखेड फाटा परिसरातील एका मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 32 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी रात्री ते सोमवारी सकाळदरम्यान घडली असून, याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अभिजीत भीमराव पवार (वय 22, रा. पिंपरखेड बु., ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे. ते उंबरखेड फाटा, देऊळगाव राजा येथील गोदावरी मेडिकल येथे मेडिकल व्यवसाय चालवतात.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पवार हे 5 जुलै रोजी नेहमीप्रमाणे दिवसभर मेडिकलवर काम करून रात्री सुमारे 10 वाजता दुकान बंद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा येथे गेले होते. त्यानंतर 6 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता ते पुन्हा मेडिकलवर आले असता दुकानाचे कुलूप तुटलेले दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता दुकानातील गल्ल्यात ठेवलेले 21 हजार रुपये तसेच बॅगेतील 11 हजार रुपये, असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर अभिजीत पवार यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. त्यावरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक 307/2026 नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 334(1), 305(A) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे यांनी पूर्ण केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान गिते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील हालचाली, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

उंबरखेड फाटा परिसरात व्यावसायिक आस्थापनांवर चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये