पत्नीच्या विरहात पतीचाही मृत्यू : भद्रावती शहरातील घटना
नियतीच्या अजब खेळाने गवराळा परिसर हळहळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील गवराळा वार्ड येथील येरकाडे कुटुंबावर अवघ्या दोन दिवसांत दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला. दिनांक ५ जुलै रोजी सौ. लता बंडू येरकाडे (वय ५२) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ६ जुलै रोजी अंत्यसंस्कार पार पडले. मात्र चितेची राखही थंड झाली नव्हती, तोच ७ जुलै रोजी त्यांचे पती श्री. बंडू येरकाडे (वय ६२) यांचेही अकस्मात निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्री. बंडू येरकाडे हे दीर्घकाळापासून लकव्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या आजारपणात पत्नी लता यांनी अखंड सेवाभावाने त्यांची काळजी घेतली. त्यांची औषधे, दैनंदिन देखभाल आणि मानसिक आधार अशा प्रत्येक क्षणी त्या त्यांच्या सोबत होत्या. मात्र नियतीने अचानक त्यांची साथ हिरावून घेतली आणि त्या धक्क्यातून श्री. येरकाडे सावरू शकले नाहीत. पत्नीच्या निधनाचे दुःख त्यांच्या मनाला असह्य ठरले आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
आयुष्यभर सुख-दुःखाची वाट एकत्र चाललेल्या या दाम्पत्याची साथ अखेरच्या प्रवासातही अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने संपुष्टात आली. जन्मोजन्मीच्या नात्याची ही भावस्पर्शी कहाणी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ठरली आहे.
येरकाडे दाम्पत्याच्या सलग निधनाने संपूर्ण गवराळा परिसर शोकमग्न झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. नियतीच्या या अजब खेळाने प्रत्येकाचे मन हेलावून गेले असून, त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात गवराळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.



