वढोली येथे भीषण आगीचे आकांडतांडव
मक्का,पाईप व शेती अवजार जळून लाखोंचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील वढोली येथे आज (दि.२०) बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात अचानक लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. या आगीत शेतकरी पांडुरंग कोहपरे व सुनील कोहपरे यांच्या शेतातील मक्का पीक, पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य व अवजारे जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या जुलै महिन्यातील खरीप हंगामाच्या तयारीसाठी अनेक शेतकरी शेतातील कचरा जाळण्याचे काम करीत आहेत. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात वारा वाहत असल्याने एका शेतातील आग दुसऱ्या शेतात पसरण्याच्या घटना वाढत आहेत. वढोली येथेही अशाच प्रकारातून आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.अर्धे साहित्य व अर्धा मक्का वाचवण्यात यश आले. मात्र आग मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेती हंगाम तोंडावर असताना झालेल्या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.



