गोंडपिपरी एमआयडीसीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
आक्षेप नोंदविण्यासाठी शेकडो ग्रामस्थांची उपविभागीय कार्यालयावर धडक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_तालुक्यात प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्याबाबत १२ गावातील शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बुधवार (दि. २० मे) रोजी शेकडो ग्रामस्थ व शेतकरी आक्षेप नोंदविण्यासाठी गोंडपिपरी येथील उपविभागीय कार्यालयावर धडकले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम ३२(२) अंतर्गत १२ गावातील नऊ हजार एकर जमिन संपादन प्रक्रियेसंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधित नोटिसांमध्ये शेतकऱ्यांना हरकती व आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. महिन्याभराच्या आत आक्षेप घेणे बंधनकारक असून त्यानुसार आक्षेप घेणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी मोठ्या संख्येने शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल झाले.
“शेती हाच आमचा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार असून कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही”, अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली. काही शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप अर्ज सादर करताना, “औद्योगिक प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, जनावरे व भविष्यातील पिढ्यांवर परिणाम होईल”, अशी भीती व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सुपीक असून कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याचे नमूद केले. MIDC साठी जमीन संपादन झाल्यास अनेक कुटुंबे भूमिहीन होतील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान,उपविभागीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे आक्षेप स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गोंडपिपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या वतीने आठवड्याभरात मोठे जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.



