शिष्यवृत्ती परीक्षेत गोल्डन किड्स अकॅडेमीच्या प्रांजल कारेकरचे घवघवीत यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गोल्डन किड्स अकॅडेमी, कोरपना येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी प्रांजल जगदीश कारेकर हिने उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
प्रांजल हिने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळविले आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही ती प्रेरणास्थान ठरली आहे. प्रांजलच्या यशाबद्दल शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक संतोष हंसकर, मुख्याध्यापक संदीप आदे तसेच शिक्षक कपिल कागदेवाड, आकाश शेंडे, रविचंद्र उमरे, हर्षा आदे, सुषमा कोरवते, विजया पायघन,पोर्णिमा आवले मॅडम व अन्य शिक्षक उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी प्रांजलचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशाचे श्रेय प्रांजल हिने आपल्या आई-वडिलांसह शिक्षकांना दिले आहे.



