ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीच्या मका खरेदी केंद्रात गोदाम उपलब्ध करण्यासाठी आमदारांना साकडे

गोंडपिपरी, भंगाराम तळोधी, तोहोगाव येथे गोदाम बांधकामासाठी निधीची मागणी ; कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुका हा तसा धान आणि कापूस उत्पादन करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पण यावर्षी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मका पिकाचे उत्पादन घेतले. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मका खरेदी करून साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदामांची व्यवस्था नसल्याने अजूनपर्यंत मका खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. यासाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी सुरू करून गोदामांची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे मागणी केली आहे.

गोंडपिपरी कार्यक्षेत्रात रब्बी हंगाम २०२५_२६ मध्ये मक्याचे उत्पादन भरपुर प्रमाणात झाले. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरीला मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसुद्धा सुरू केली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या पत्रानुसार तहसील कार्यालयाच्या शासकीय धान्य गोदामात मका खरेदी सुरू करण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, शासकीय धान्य गोदामात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील इतर केंद्रात मका खरेदी सुरू झाली असल्यामुळे आपल्या तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू होणार की नाही..?, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत मका पिकाची पूर्णतः कापणी झाली असून निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान होईल की काय..? या विवंचनतेत शेतकरी हतबल झालेला आहे. शेतकरी आपल्या हक्काच्या बाजार समितीमध्ये मका खरेदी केव्हा सुरू होणार..?, असा प्रश्न वारंवार उपस्थित करीत आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन मका खरेदी करण्याकरिता गोदामांची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची भेट घेऊन करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्नील अनमुलवार, संचालक निलेश पुलगमकर, सुहास माडुरवार, राजू गोहणे, मारोती अम्मावार यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

*गोदाम बांधकामासाठी निधीची गरज*

गोंडपिपरी तालुक्यात स्थानिक शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीची मुख्य बाजारपेठ असून भंगाराम तळोधी आणि तोहोगाव येथे उपबाजारपेठ आहेत. तालुक्याचा विस्तार हा मोठा असून शेतकऱ्यांचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. शेतमालाच्या साठवणुकीकरिता शेतकरी आपल्या हक्काच्या बाजार समितीकडे धाव घेत असतो. मात्र शेतमाल साठवणुकीकरिता बाजार समितीकडे पुरेसे गोदाम उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकरीवर्गाची ही अडचण दूर करण्यासाठी मुख्य बाजारपेठ गोंडपिपरी, उपबाजारपेठ भंगाराम तळोधी आणि तोहोगाव येथे गोदाम बांधकामासाठी निधीची उपलब्धता करावी, अशी मागणीही आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये