गोंडपीपरीत सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री
किराणा दुकानाच्या आडून चालतोय गोरखधंदा ; संबंधित विभागाचे विक्रीकडे दुर्लक्ष की मूकसंमती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्री, साठवणूक आणि उत्पादनावर कडक कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन राज्य सरकारने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत ही बंदी घातली असली तरी, गोंडपिपरी शहरासह तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री होताना दिसून येत आहे. किराणा दुकानाच्या नावाखाली हा गोरखधंदा चालत असून, याकडे संबंधित विभागाचे मुद्दाम दुर्लक्ष आहे की या व्यवसायाला प्रशासनाची मूकसंमती आहे, हा संशोधनाचा विषय आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गावागावात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, या खर्रा खाणाऱ्यांची “तलप” भागविण्यासाठी सुगंधित तंबाखू विक्रेते ठाण मांडून बसले आहेत. आपल्या किराणा दुकानाच्या मालांसह खुलेआमपणे सुगंधित तंबाखूची विक्री होताना दिसून येत आहे. गोंडपिपरी शहरातून हा सुगंधित तंबाखू तालुक्यातील संपूर्ण गावागावात पोहोचला जात आहे. या सुगंधित तंबाखूसह गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असून, अनेक किराणा दुकाने आणि पानाठेल्यांवर गुटख्याच्या माळा लावलेल्या दिसतात. हा सुगंधित तंबाखू विक्रीचा प्रकार राजरोसपणे चालू असूनही आजपर्यंत एकही कारवाई झालेली नसल्यामुळे संबंधित विभागाच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा चालू असल्याचे दिसून येत आहे.
सुगंधित तंबाखूची विक्री आणि साठवणूक करण्यास कायध्यानुसार बंदी असल्याने, या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाकडून कारवाई केली जाते. आणि या कारवाईत दोषी दोषी आढळून आल्यास कारावास आणि दंडाची तरतूद सुद्धा आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून गोंडपिपरी तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यांवर कारवाई न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून, खरंच गोंडपिपरी तालुक्यात सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय होतंच नाही का..?, आणि हा व्यवसाय खुलेआम चालत असेल तर तो नेमका कोणाच्या वरदहस्ताने..? हा प्रश्न निर्माण होतो आहे.
*पुरुषाइतक्याच महिलाही व्यसनाधिनतेच्या विळख्यात*
गावागावात पुरुष मंडळींसोबतच महिलांमध्येही खर्रा खाण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे अनेक महिलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरुणांमध्ये या व्यसनाची “फॅशन” झाली असून, अनेक तरुण प्रभावित होत आहेत. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात आजारांची नवी मालिका सुरू होईल, यात शंका नाही.
*विविध आजाराला आमंत्रण*
सुगंधित तंबाखूमध्ये निकोटिन असल्याने सेवन करणाऱ्याला तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतात, तोंडाचे गंभीर आजार होऊ शकतात, निकोटिनमुळे हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो, फुफ्फुसे निकामी होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊन पुरुषांना नपुसंकत्व आणि महिलांमध्ये गर्भाशयांच्या आजारांसह गर्भपात किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुगंधित तंबाखूचे व्यसन म्हणजे आजाराला आमंत्रण देणे आहे.



