
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील मुख्य मार्गावरील डॉ. गुंडावार यांच्या दाताच्या दवाखान्याच्या पायरीवर एका वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रामभाऊ पुंडलिक ठाकरे (वय ७२, रा. झिंगूजी वॉर्ड, भद्रावती) असे मृत व्यक्तीचे नाव असून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध दवाखान्याच्या पायरीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिस व आरोग्य विभागाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या शहरासह परिसरात तीव्र उष्णतेची लाट सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार रामभाऊ ठाकरे यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.



