पोंभुर्णा पोलीस स्टेशन परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा शहरातील पोलीस स्टेशन परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील बोरवेलला पाणी नसल्यामुळे शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात पोलीस स्टेशन, भूमिलेख कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी अधिकारी कार्यालय, मुलींचे वसतिगृह यांसह अनेक शासकीय कार्यालये असून दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येथे येत असतात. मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडल्यामुळे कर्मचारी, विद्यार्थीनी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पाण्याची टंचाई अधिकच गंभीर बनली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करावी तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



