ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वलगाव येथील ७ दिवसीय शिबिरात ३८ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथांवरील पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांचे संयुक्त आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.

राजेंद्र मर्दाने, वरोरा.

     डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयएएस तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास, मार्गदर्शन व संस्कार घडविण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच त्रिवेणी फाउंडेशन, अमरावती यांच्या सहकार्याने येत्या १६ ते २२ मे दरम्यान अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे ७ दिवसीय ‘मिशन आयएएस’ राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये ‘दीपस्तंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील गाजलेल्या व सर्वपरिचित अशा ३८ आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेच सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या यशोगाथांचा समावेश करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (आयएएस) यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक २२ मे रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. अमरावती व नागपूर येथे कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध ज्ञानपथ पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, या पुस्तकाचे संपादन सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ तथा डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे.

या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी सर्वश्री विकास खारगे, तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे, विजयालक्ष्मी बिदरी, निधी पांडे, डॉ. श्रीकर परदेशी, मनोज कुमार शर्मा, भाग्यश्री बानायत, विशाल नरवाडे, पुरुषोत्तम भापकर, दिलीप पांढरपट्टे, संगीता महापात्रा, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अकोल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ग्रामविकास मंत्रालयाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार दीपक म्हैसेकर, महाराष्ट्राचे प्रधान आयकर आयुक्त अभिनय कुंभार, सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे, राहुल रेखावार, रवींद्र जाधव, तेजस्वी सातपुते, भारत आंधळे, पल्लवी चिंचखेडे, अमरावतीचे सुपुत्र व दतिया येथील जिल्हाधिकारी स्वप्नील वानखडे, सौम्या शर्मा चांडक, अप्पर आयुक्त राजेश खवले, नम्रता ठाकरे, वर्षा भाकरे, प्राजक्ता बारसे, अक्षय गडलिंग, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आदी सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या यशोगाथांचा समावेश आहे.

‘दीपस्तंभ’ या गौरवग्रंथामध्ये समाविष्ट असलेले बहुतांश अधिकारी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या ‘मिशन आयएएस’ उपक्रमात वेळोवेळी सहभागी झालेले आहेत. अकादमीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत असल्याची माहिती पुस्तकाचे संपादक व मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मराठी भाषेमध्ये ३८ गाजलेल्या सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या यशोगाथांचा समावेश असलेले हे पहिलेच पुस्तक असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये