ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याची ग्रामस्थांची तयारी
व्याहाड बूज. मध्ये पाणी पेटला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सध्या सर्वत्र तापमानाचा उखाळा वाढलेला आहे. अंगाची लाही लाही होत असताना व्याहाड बूज. ग्राम पंचायत ची ग्रामसभा दिनांक १४ मे रोजी ग्रामपंचायत मध्ये सुरू असताना येथील वॉर्ड क्रमांक ३ येथील दलीत वस्तीतील सर्व नागरिक ग्रामसभेत येऊन आमच्या वस्तीत नळाचे पाणी कधी सुरू होणार ? असा प्रश्न विचारून आठ दिवसांमध्ये दलित वस्तीमध्ये नळाचे पाणी न आल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवलेली आहे.
सावली तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेले व्याहाड बुज. येथे ६ हजार च्या वर लोकसंख्या आहे. या गावात जीवन प्राधिकरण तर्फे नळाचे पाणी सुरू असून त्यावर ग्रामपंचायतचे देखरेख आहे.
मात्र येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील दलित वस्तीमध्ये गेल्या वर्षभरापासून नळाला पाणीच येत नाही. यामुळे येथील नागरिकांनी डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायतला पाणी संदर्भात नागरिकांच्या सहीने अर्ज सादर केले होते . मात्र येथील ग्रामपंचायत प्रशासन यांनी या अत्यंत गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून आले . त्यातच दिनांक 14 मे रोजी दुपारी दीड वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . ही बाब येतील दलित वस्तीतील नागरिकांना माहिती होताच त्यांनी जवळपास दीडशे लोकांचा ताफा घेऊन ग्रामपंचायत वर चालून आले. आणि ग्रामसभेमध्ये १ वर्षभर पाणी न आल्यामुळे आमचे १ वर्षाचे पाणी कर माफ करण्यात यावे.
तसेच येत्या ८ दिवसात जर दलित वस्तीमध्ये नळाचे पाणी सुरू न झाल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा नागरिकांनी ग्रामसभेत दिल्यामुळे येथील ग्रामपंचायत प्रशासनाचे धाबे दणाणलेले आहे. आता यावर ग्रामपंचायत प्रशासन आठ दिवसात कोणती उपाययोजना करणार ? याकडे गावातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे .



