वाढदिवस ठरला पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
बंडू बुरांडे यांच्याकडून १५१ वृक्षांची लागवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :-पर्यावरणाचे वाढते संकट, घटते वनक्षेत्र आणि बदलते हवामान लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या
वनमहोत्सव निमित्ताने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पोंभूर्णा व संयुक्त वनव्यवस्थापन समिती जामखुर्द यांच्या विद्यमाने जामखुर्द येथे विविध प्रजातींच्या १५१ वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत
वृक्षप्रेमी बंडू बुरांडे यांनी वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श घालून दिला आहे.या उपक्रमात नागरिक, युवक व पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षलागवडीनंतर प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला.
यावेळी या उपक्रमात माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम,माजी सरपंच बंडू बुरांडे,वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत राखुंडे,क्षेत्र सहायक श्याम यादव,ग्राम पंचायत अधिकारी सुभाष तेलमासरे, नीलकंठ ठाकरे,विजय वासेकर,सुरज गोरंतवार,वनरक्षक प्रतीक बोबडे,मेघा वासेकर, भोलेश्वर सोनेकर, राकेश धनविजय, धर्मेंद्र मेश्राम, जुही आत्राम यांची उपस्थिती होती.
झाडे लावणे ही काळाची गरज असून, प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासह इतर आनंदाच्या प्रसंगी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन बंडू बुरांडे यांनी यावेळी केले.पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, समाजात सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.



