ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पांदण रस्त्यासाठी शेतकऱ्याची तहसीलदाराकडे धाव

दोन वर्षांपासून तहसीलमध्ये अर्ज प्रलंबित : शेती कामकाजावर परिणाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील शेतकरी मधुकर खरवडे यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पांदण रस्त्याच्या मागणीसाठी तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. मागील दोन वर्षांपासून संबंधित अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.

मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अर्ज प्रलंबितच ठेवण्यात आल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे खरवडे यांनी सांगितले. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेती कामकाजावर मोठा परिणाम होत असून, अनेकदा अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतरही केवळ आश्वासने मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाकडून काही पर्यायी मार्ग सुचविण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कोणताही मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अखेर खरवडे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

या संदर्भात तहसीलदार राजेश भांडारकर यांनी, “शेतकऱ्याला निश्चित न्याय मिळेल; मात्र कायदा हातात घेऊ नये,” असे सांगत संयम राखण्याचे आवाहन केले.

खरवडे यांनी आवश्यक नोंदणीकृत कागदपत्रे सादर केली असून, पावसाळा तोंडावर असताना तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रस्ता उपलब्ध न झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेत, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळणे हा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित केले आहे. रस्ते अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तरीही, विंजासन येथील या प्रकरणात स्थानिक पातळीवर होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्याला न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता प्रशासन तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्याला दिलासा देणार का, की हा प्रश्न आणखी लांबणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये