ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद चंद्रपूरचा नवा पायंडा

महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट

दिनांक – 6/5/2026.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त, दिनांक 1 मे 2026 रोजी जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पुलकित सिंह, यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दहावी (SSC) परीक्षेत नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती येथील कु. वैशाली राहुल बेताल (95.40%) व जिल्हा परिषद हायस्कूल, नांदगाव (ता. मूल) येथील कु. गौरव लक्ष्मण महामंडळे (95.20%) या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.

         महाराष्ट्र दिनासारख्या प्रतिष्ठित शासकीय सोहळ्यात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यामागील हेतू म्हणजे गुणवत्तेला समाजाच्या केंद्रस्थानी स्थान देणे आणि त्यांच्या शैक्षणिक यशाला व्यापक सामाजिक मान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणे हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू आहे. मुख्य व्यासपीठावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत स्थान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात “मीही अशीच कर्तृत्वाची उंची गाठू शकतो” असा आत्मविश्वास निर्माण होतो.

           या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना संदेश दिला जात आहे की, शासकीय शाळांतूनही उत्कृष्ट शिक्षण घेऊन राज्यस्तरावर यश संपादन करणे शक्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, आत्मविश्वास आणि उत्कृष्टतेची प्रेरणा निर्माण होईल.

           यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुलकित सिंह म्हणाले, “गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ गौरवाचा क्षण नसून, शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता-केंद्रित संस्कृती दृढपणे रुजविण्याचा हा एक जाणीवपूर्वक उपक्रम आहे. जिल्हा परिषद शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अपार क्षमता दडलेली आहे; योग्य दिशा, सक्षम मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळाल्यास ते निश्चितच यशाची शिखरे गाठू शकतात.”

           जिल्हा परिषद चंद्रपूरचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरत असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी दहावी-बारावी परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी प्रेरित होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये