प्रीती जगझाप शिवांजली बालसाहित्य सन्मान पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी-जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवात, चंद्रपूर येथील लेखिका सौ. प्रीती विलास जगझाप यांना गौरवण्यात आले. त्यांच्या ‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता: आस्वाद आणि अभ्यास’ या बालसाहित्य समीक्षा ग्रंथाला ‘डॉ. लक्ष्मण इंगळे पुरस्कृत शिवांजली बालसाहित्य सन्मान’ (विभागून) प्रदान करण्यात आला.
जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्यनगरीत, पद्मश्री नारायण सुर्वे सभागृहात ३ मे २०२६ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. १ ते ३ मे दरम्यान चाललेल्या या त्रिदिवसीय महोत्सवाचे आयोजन शिवांजली परिवाराचे प्रवर्तक शिवाजी चाळक यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा. मा. रा. लामखडे, प्रा. द. स. काकडे, शिवाजी चाळक, प्रा. साईनाथ पाचारणे आणि संदीप वाघोले यांसारखे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सौ. जगझाप यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि १७०० रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रीती जगझाप यांनी प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या कवितेवर केलेल्या सखोल अभ्यासपूर्ण समीक्षेची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे. या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



