पेट्रोल डिझेलच्या तुडवड्याने वाहतुकीची कोंडी
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वाहनाची रीघ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चारही राज्याच्या निवडणुका घोषित झाल्या खऱ्या, मात्र डिझेल पेट्रोल, गॅस किंमतीचा भडका उडण्याच्या धास्तीने व इंधनाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर रीघ लावल्याचे दृश्य आज भद्रावती येथे दिसून आले.
आज सकाळपासून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन नसल्याने कुचंबणा होत होती, दुपारी तीन नंतर इंधन आले असता शहरातील, व राज्य महामार्गावरील चालणारी वाहनानी इंधन भरण्यास एकच गर्दी केल्याने नागपूर-चंद्रपूर महामार्ग चक्क चक्का जाम झाल्यागत वाहनाच्या रिघेने व्यापून गेला होता.
ट्रॅफिक पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेचा गलथानपणा यानिमित्ताने दिसून आला. वाहतुकीच्या अयोग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहनांचा अक्षरशः खोळंबा झाला होता. शेकडो वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्गावरून प्रवास करणारे व भद्रावती शहरात प्रवेश करणारे कित्येक वाहने अडकून पडले होते.
यामुळे शहरातील नागरिक व प्रवासी यांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून आले. महामार्गावरील वाहतूक कोंडी बघता कायमस्वरूपी उपाय योजना अत्यंत निकडीची असल्याची प्रतिक्रिया भद्रावतीकर व्यक्त करू लागले आहेत.


