धाबा ग्रामपंचायतच्या कथित ८० लाखांच्या गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात!
२० दिवस उलटूनही चौकशी नाही, पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील धाबा ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे व खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करूनही तब्बल २० दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. परिणामी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षांत अंगणवाडी साहित्य, शैक्षणिक साहित्य, सोलर यंत्रणा, रंगरंगोटी, बूट-ड्रेस, वॉटर कूलर तसेच कचरा व्यवस्थापन यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक साहित्य खरेदी, बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी तसेच प्रत्यक्षात साहित्य वितरित न केल्याचेही गंभीर आरोप समोर आले आहेत. काही ठिकाणी खर्च दाखवून कामे न झाल्याची नोंद असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमूद केले आहे.
एसी, स्ट्रीट लाईट, एलईडी टीव्ही, सोलर पंप, इंटरलॉकिंग, साफसफाई व स्टेशनरी खरेदीतही मोठ्या प्रमाणावर विसंगती असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित अफरातफरीमुळे गावात तीव्र नाराजी आहे. यापूर्वी झालेल्या उपोषणानंतरही चौकशी सुरू न झाल्याने शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धडक देत निषेध नोंदविला होता. १६ तारखेला प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला; मात्र त्यानंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.
“आता केवळ आश्वासन नको, तर थेट कारवाई हवी.” गावाच्या विकास निधीतील कथित गैरव्यवहारावर निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे.-
*नामदेव सांगळे, माजी सरपंच,ग्रामपंचायत धाबा*
“गावाच्या विकासासाठी आलेला निधी कुठे गेला, याचे उत्तर प्रशासनाने द्यायलाच हवे. २० दिवस झाले तरी चौकशी नाही, ही बाब संशयास्पद आहे. आता आम्ही मागे हटणार नाही.”
*रामकृष्ण सांगडे, माजी सदस्य ,ग्रामपंचायत धाबा*
“प्रशासनाने २० दिवसांत साधी प्राथमिक चौकशीही सुरू केली नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण व्यवहाराची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही; आठवडाभरात बेमुदत उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
*सुरज भस्की, ग्रामस्थ*


