भारती अलोणेच्या यशाला हणमंतू झाडे यांचा आधार
तारसा येथील होतकरू विद्यार्थिनीला आर्थिक मदत, शिक्षणासाठी समाजाने पुढे येण्याचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ समाजात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही केवळ जबाबदारी नसून एक सामाजिक कर्तव्य आहे, याचे जिवंत उदाहरण गोंडपिपरी येथील प्रतिष्ठित व्यापारी व समाजसेवक हणमंतू झाडे यांनी घालून दिले आहे. तारसा येथील अत्यंत गरीब पण जिद्दी विद्यार्थिनी भारती किशोर अलोणे हिने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिच्या घरी जाऊन झाडे यांनी तिचा सन्मान करून तिच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली.
स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथून विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या भारतीने ७०.६७ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवणे हे तिच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे द्योतक आहे. तिचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आईही शेतमजुरी करून संसाराला हातभार लावते. अशा परिस्थितीतही शिक्षणाची ओढ कायम ठेवत भारतीने मिळवलेले यश हे प्रेरणादायी ठरत आहे.
ही बाब समजताच हणमंतू झाडे यांनी कोणताही दिखावा न करता थेट तिच्या घरी भेट दिली. त्यांनी भारतीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी काही रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. या वेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत “अशा होतकरू मुलांना योग्य संधी मिळाली तर ते नक्कीच मोठे यश मिळवू शकतात. समाजातील सक्षम घटकांनी अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.
हणमंतू झाडे हे केवळ व्यापारी म्हणून नव्हे तर समाजातील गरजूंना मदतीचा हात देणारे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने योगदान देत असतात. त्यांच्या या कृतीतून समाजात सकारात्मक संदेश जात असून इतरांनीही अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, भारतीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांकडून तिचे कौतुक केले जात आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही हार न मानता शिक्षणाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या भारतीने अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
तिच्या पुढील शिक्षणासाठी समाजातून मिळणारे असे सहकार्य तिच्या स्वप्नांना बळ देणारे ठरणार आहे.यावेळी गोंडपिपरी येथील उद्योजक हणमंतू झाडे, कांग्रेस चे गोंडपिपरी शहर अध्यक्ष राजू झाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश लभाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक समितीचे सचिव राजकपूर भडके, कांता भडके,वडील किशोर अलोणे, आई किरण अलोणे आदिची उपस्थिती होती


