ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नैसर्गिक शेतीशाळेतून महिलांना “कृषी संजीवणी”चे धडे

धान पिकावरील रोग-किडींच्या नियंत्रणासह हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मौजा आक्सापूर येथे भात पिकासाठी नैसर्गिक महिला शेतीशाळा राबविण्यात येत आहेत. यजमान शेतकरी मंगला गोसाई नागापुरे यांच्या शेतात सुरू असलेल्या या शेतीशाळेत आतापर्यंत तीन वर्ग घेण्यात आले असून, मंगळवार (दि. २२) चौथा वर्ग पार पडला. यावेळी महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, कीड-रोग नियंत्रण, जमिनीतील ओलावा टिकविणे तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील विविध योजनांची माहिती देण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेतीशाळा सुरू आहे. यापूर्वी झालेल्या वर्गांमध्ये शेतीशाळेचा परिचय, जमीन आरोग्य, बीजप्रक्रिया, बीजामृत व जीवामृत तयार करण्याची पद्धत, सापळा पिकांची लागवड तसेच शत्रू व मित्र कीटकांची ओळख याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपकृषी अधिकारी पी.पी. पेंदोर, मंडळ कृषी अधिकारी तावाडे, सहाय्यक कृषी अधिकारी पी.डी. नागुलवार व समूह सहाय्यक दीक्षा पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

चौथ्या वर्गात समूह सहाय्यक दीक्षा पाटील यांनी जीवामृत व बीजामृताचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच महिला सक्षमीकरण अधिनियमाबाबत माहिती देत महिलांनी जास्तीत जास्त अर्ज करून शेतकरी प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे आवाहन केले.

सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिकांना अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा कसा करावा, जमिनीतील ओलावा कसा टिकवावा आणि गरजेनुसार योग्य वेळी रासायनिक फवारणी कशी करावी, याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी पी.डी. नागुलवार यांनी मार्गदर्शन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत उपलब्ध विविध योजनांची माहिती देत पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उपकृषी अधिकारी पी.पी. पेंदोर यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर धान पिकावर उद्भवू शकणाऱ्या कडा करपा व खोडकिडीच्या प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले. कडा करपा नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ५० टक्के २५ ग्रॅम व स्ट्रेप्टोसायक्लिन ६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने शिफारस केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कामगंध सापळे तसेच ट्रायकोग्रामा जापोनिकम या परोपजीवी कीटकांचा वापर करून जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी कृषी ताई रीना धोडरे, कृषी सखी मंगला नागापुरे यांच्यासह गटातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींची माहिती घेत प्रत्यक्ष शेतीमध्ये त्याचा वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये