ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयडीसीच्या विरोधात बोरगावांत होणार पहिली शेतकरी परिषद

शेतकरी आक्रमक, आक्षेपासाठी धावाधाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ करंजीतील एमआयडीसीत दहा हजार कोटी रूपयाची गुंतवणूक केलेल्या उदयोगाची उभारणी करण्यात येणार आहे.याकरिता बारा गावातील दहा हजार एकर शेती जाणार आहे.याविरोधात हजारो शेतकरी चांगलेच भडकले आहेत.आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमची शेती देणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली आहे.दरम्यान येत्या आठ मे रोजी बोरगांव येथे यासंदर्भातील पहिली शेतकरी परिषद घेण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील एमआयडीसी च्या माध्यमातून दहा हजार कोटी रूपयाची गुंतवणूक केलेला प्रकल्प उभारण्यात येणार आहे.दरम्यान या प्रकल्पाकरिता दहा हजार एकर शेती अधिग्रहीत करण्यात येणार आहे.शेतक-यांच्या सुपिक जमीनी हडपण्याचा हा डाव आहे.आम्हाला उदयोग नकोच,आमची शेतीच आम्हाला हवी आहे.अशी भुमिका बारा गावातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.

सुरजागड,कोनसरी येथील प्रकल्पाने तेथील शेतकरी बांधवांची झालेली फसवणूक आम्ही बघत आहोत. अशी चुक कुठल्याही स्थितीत आम्ही करणार नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.सदर जागा अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेची शेतकरी बांधवांना शेवटच्या क्षणापर्यत माहिती दिली गेली नाही.अचानकपणे हि माहिती समोर आल्यानंतर शेतक-यांना मोठाच धक्का बसला.

या प्रकल्पामुळे बारा गावातील हजारो शेतकरी भुमिहीन होणार आहेत.हा प्रकल्प शेतक-यांच्या जिवाशी उठला आहे.अशात आता शेतक-यांनी अतिशय आक्रमक भुमिका घेतली आहे. दरम्यान शेतकरी एकता संघर्ष समितीच्या माध्यमातून कायदेशिर रित्या जातीय वर्गवारीनुसार शेतक-यांची माहिती गोळा करण्याचे काम जोरात सुरू आहे. उपविभागीय अधिका-यांकडे आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी धावाधाव करित आहेत.

बारा गावातील शेतक-यांत जनजागृती करण्यासाठी बोरगांव येथे आठ मे रोजी यासंदर्भातील पहिली शेतकरी परिषद आयोजीत करण्यात आली आहे.या परिषदेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.सुरेश माने तर उदघाटक बोरगांवचे भुमिपूत्र प्रसिद्ध प्रबोधनकार डॉ. अनिरूध्द वनकर असणार आहेत. यावेळी अ.भा किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य अरूण लाटकर, ॲड. दिपक चटप यांचेही मार्गदर्शन होणार आहे.

अधिग्रहणाच्या प्रक्रियेला ९० दिवसांचा कालावधी अपेक्षित असतांना केवळ ३० दिवसांच्या कालावधीत हि प्रक्रिया गुंडाळण्याचा अट्टाहास प्रशासनाकडून केल्या जात आहे. हा अतिशय अन्यायकारक प्रकार असून आम्ही कुठल्याही स्थितीत आमची शेती देणार नसल्याची भुमिका शेतक-यांनी घेतली आहे.

दरम्यान शेतकरी एकता संघर्ष समितीने पत्रपरिषद घेत आपली भूमीका मांडली आहे. यावेळी राजेश कवठे, शालीकराम माउलीकर, कमलेश निमगडे, ऍड. सचिन फुलझेले, रामकृष्ण सांगडे, राहुल सोनटक्के, मारोती पाटील भोयर, दत्तू धुसे, विनोद दुर्गे, गणेश कोटनाके, भारत धंदरे यांच्यासह मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये