किन्ही पवार येथे होत असलेला बालविवाह रोखला
देऊळगाव राजा पोलिसांची तत्पर कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह वेळीच थांबवण्यात यश आले आहे. २ मे २०२६ रोजी CCTNS प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत किन्ही पवार येथे ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, १८ वर्षांखालील मुलीचा विवाह ३ मे रोजी होणार असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक पाठवले. या पथकात पोउपनि राजकुमार मोहोळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.
पोलिसांनी किन्ही पवार येथे पोहोचून माहितीची पडताळणी केली असता, संबंधित मुलगी (वय १५ वर्षे ६ महिने) ही आई-वडिलांसोबत आढळली. त्या ठिकाणी विवाहपूर्व विधी सुरू असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हा बालविवाह थांबवला. यानंतर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, पोउपनि राजकुमार मोहोळकर, मपोउपनि विकार पटेल, एएसआय प्रमोद मुळे, पोहेकॉ रामकिसन गिते, समाधान गिते, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल नांदे तसेच चालक विजय दराडे यांनी सहभाग घेतला.
१८ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनवावे आणि योग्य वय झाल्यानंतरच विवाहाचा विचार करावा. तसेच, समाजातील सुजाण नागरिकांनी कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती प्रशासनाला द्यावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन ब्रम्हा गिरी, पोलीस निरीक्षक, देऊळगाव राजा यांनी केले आहे.



