ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टरांची अविरत सेवा!

दुर्गम भागातील रुग्णांना मिळतोय नवसंजीवनीचा दिलासा ; २४ तास रुग्णसेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

औषधसाठ्यासह सर्पदंश व रॅबीज लसीची उपलब्धता; स्थानिक पातळीवरच उपचारांची सुविधा

जिवती :- ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी, तसेच उपचारासाठी होणारा वेळ आणि आर्थिक खर्च वाचावा, या उद्देशाने जिवती प्राथमिक आरोग्य केंद्राला बढती देऊन सुमारे वर्षभरापूर्वी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. महिनाभरापूर्वी आरोग्य विभागाने येथे तीन एमबीबीएस पदवीधर डॉक्टरांची नियुक्ती केल्याने रुग्णालयाच्या आरोग्यसेवेला मोठी चालना मिळाली आहे. डॉ. प्रमेय भगत, डॉ. मकरंद हजारे आणि डॉ. डेव्हिड देशपांडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. सुरज मडावी हे चारही वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस रुग्णसेवा बजावत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे जिवती परिसरातील रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिवती तालुका हा दुर्गम आणि पूर्णतः ग्रामीण भाग असून येथे आरोग्यासह अनेक मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय कोरडवाहू शेती असून आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. त्यामुळे आजारपणाच्या काळात मोठ्या शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी उपचारासाठी जाणे अनेक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा अपुरा साठा आणि आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी इतरत्र रेफर करावे लागत होते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असे. मात्र, ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर परिस्थितीत बदल होताना दिसत आहे. सध्या रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्पदंशावरील लस तसेच रॅबीजची लसही उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांवर जिवतीतच उपचार करणे शक्य होत आहे. केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे रेफर केले जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

*संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची धावपळ*

सध्या परिसरात मलेरिया आणि टायफॉइडसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून ताप, थकवा आणि इतर विविध लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चारही वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस सेवा देत असून रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तत्पर सेवेमुळे अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी डॉ. विशाल पवार यांनीही जिवती येथे उल्लेखनीय आरोग्यसेवा दिली होती. आता तीन नव्या एमबीबीएस डॉक्टरांसह चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने जिवती व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण रुग्णालयातील या सेवेमुळे स्थानिक नागरिकांना ‘नवसंजीवनी’ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

*सलाइन, इंजेक्शनबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न*

जिवती व परिसरातील शेकडो रुग्ण उपचारासाठी दररोज रुग्णालयात येत आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार सलाइन, इंजेक्शन किंवा औषधोपचार केले जात आहेत. काही ग्रामीण रुग्णांकडून स्वतःहून सलाइन किंवा इंजेक्शन देण्याची मागणी केली जाते. मात्र, प्रत्येक आजारासाठी सलाइन किंवा इंजेक्शन आवश्यक नसते, याबाबत डॉक्टरांकडून रुग्णांना योग्य माहिती देऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

*आवश्यक सुविधांकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज*

दुर्गम ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या या नवतरुण डॉक्टरांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने जिवती ग्रामीण रुग्णालयाकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, औषधे, तपासणी सुविधा आणि इतर मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्यास या डॉक्टरांना अधिक सक्षमपणे सेवा देता येईल. त्यामुळे जिवतीसह परिसरातील ग्रामीण जनतेला अधिक प्रभावी, वेळेवर आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा स्थानिक पातळीवरच मिळण्यास मदत होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये