ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वादळी पावसाने कृषी कार्यालयाचे छप्पर उद्ध्वस्त

कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केली तात्पुरती डागडुजी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुरुस्तीला विलंब  

जिवती :- जिवतीत काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे जिवती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या जुन्या टिनपत्रांचे छप्पर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कार्यालयाच्या मागील बाजूचे मोठे झाड कोसळल्याने ही घटना घडली. कार्यालयीन वेळ संपलेली असल्याने मोठी दुर्घटना टळली.

छप्पर तुटल्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयात शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ पुढाकार घेत तुटलेल्या छपरावर ताडपत्री टाकून तात्पुरती व्यवस्था केली. प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे सध्या कार्यालयीन कामकाज सुरू ठेवणे शक्य झाले आहे.

दरम्यान, दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता आणखी आठ-दहा दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयासमोरील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची डागडुजी चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाली असून केवळ विद्युत जोडणीअभावी इमारत वापराविना पडून आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी संकटाच्या परिस्थितीत केलेल्या मेहनतीचे तालुका कृषी अधिकारी यांनी कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये