भद्रावती बसस्थानकातील समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक
खड्डे बुजवा, हायमॉक्स दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवा : अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती बसस्थानक परिसरातील खड्डे, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी भद्रावती शहर काँग्रेस च्या वतीने राज्य परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यासंदर्भात राज्य परिवहन विभागाच्या वरोरा आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. बसस्थानक परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांसह बसचालक व वाहकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, चोरी व महिलांच्या दागिन्यांची चोरी तसेच खिसे कापण्यासारख्या घटना वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, रात्री पुरेशा प्रकाशासाठी हायमॉक्स दिवे बसवावेत तसेच अनुचित प्रकार, चोरी व छेडछाडीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी राज्य परिवहन व्यवस्थापनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना काँग्रेसचे अॅड. सुनील नामोजवार, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष यांच्यासह सूरज गावंडे, शहर अध्यक्ष भूपेश कायरकर, संदीप चटपकर, सुनीता खंडाळकर, अपर्णा सातपुते, विरोधी पक्ष नेत्या सरिता सूर, पल्लवी तामगडे, प्रथम गेडाम, रितेश वाढई, मनोज कोथडे, अब्बास अजानी, हनुमान घोटेकर, छबुताई राऊत आणि कल्पना मत्ते आदी उपस्थित होते.



