गणेश विसर्जनासाठी भद्रावती नगर परिषद सज्ज
आसना तलाव परिसरात विशेष व्यवस्था : विसर्जनाची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत ठेवण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्राच्या वैभवशाली गणेशोत्सव परंपरेनुसार भद्रावती शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नगर परिषद प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार असून, गवराळा येथील आसना तलाव परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी तलाव परिसरातील वरदविनायक प्रवेशद्वार सज्ज करण्यात आले आहे. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगर परिषद कर्मचारी विविध कामांमध्ये व्यस्त आहेत.
दरम्यान, आज दि. २४ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनाची वेळ रात्री १० ऐवजी ११ वाजेपर्यंत ठेवण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे गणेश मंडळे व भाविकांचे लक्ष लागले आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सध्या लागू असलेल्या नियमानुसार रात्री १० वाजल्यानंतर वाद्य वाजविण्यास बंदी असून, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जनाच्या संपूर्ण व्यवस्थेवर नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचे विशेष लक्ष असून, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत, शिस्तीत व सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



