गोंडपिपरीच्या कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयात तारसाच्या मुलींची दणदणीत कामगिरी
बारावीच्या विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कलाशाखेचा ९३.७५ टक्के निकाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ येथील स्व. लक्ष्मणराव ज. कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल अत्यंत समाधानकारक व अभिमानास्पद लागला असून यंदाही विद्यार्थिनींनीच दोन्ही शाखांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळे या यशाची नोंद घेण्यात येत आहे.
विज्ञान शाखेत एकूण ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व ७७ विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकालाची नोंद झाली. या शाखेत भारती किशोर अलोणे हिने ७०.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या मागोमाग वसुंधा सुनील नवघडे (६७.३४%) हिने द्वितीय, तर स्नेहल राजू कस्तुरे (६७%) हिने तृतीय क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.
कलाशाखेतही विद्यार्थिनींचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला. या शाखेत ८० पैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९३.७५ टक्के निकाल लागला आहे. विजयालक्ष्मी विजय अंबटकर हिने ८१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अचल दुष्यंत लिंगे (७७.८३%) हिने द्वितीय, तर वैष्णवी शंकर धांडरे (७४.६७%) हिने तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळ मिळाले असून परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही शाखांमध्ये मुलींनीच अव्वल स्थान पटकावल्याने मुलींच्या प्रगतीचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा महत्त्वाचा ठरला असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे.



