मालवाहतूक व दुचाकीची समोरासमोर धडक
दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर नंदोरी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून मालवाहतूक वाहनातील दोघे जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 34 बीजी 0156 क्रमांकाचे मालवाहतूक वाहन वरोरा येथून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, एम एच 32 बीए 7386 क्रमांकाची दुचाकी भद्रावती येथील लग्न समारंभ आटोपून खानगाव (मोझरी) ता. हिंगणघाट कडे जात असताना नंदोरी गावाजवळ दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीवरील चंद्रशेखर वालदे वय 29, रा. खानगाव मोझरी, ता. हिंगणघाट व मयूर हाडके वय 33, रा. खानगाव मोझरी, ता. हिंगणघाट यांचा जागीच मृत्यू झाला. तर मालवाहतूक वाहनातील अक्षय थेरे वय 30 व रघुनाथ डाखोरे रा. अंभोरा, चंद्रपूर हे जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. हा अपघात महामार्गावरील खोदलेल्या रस्त्यामुळे एकतर्फी रस्ता चालू असल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. कित्येक दिवसापासून हा महामार्ग खोदून असून अद्यापही या महामार्गाचे काम पूर्णत्व झाले नसल्याने हा अपघात घडल्याचे समजते.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.



