घुग्घुस नगर परिषदेत ‘एप्रिल फूल’ आंदोलनावर राजकीय घमासान
आरोप-प्रत्यारोप तीव्र

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर | नगर परिषदच्या मासिक बैठकीपूर्वी 29 एप्रिल रोजी भाजप नगरसेवकांनी केलेल्या ‘एप्रिल फूल’ आंदोलनामुळे शहरातील राजकारण तापले आहे. एका बाजूला विरोधकांनी विकासकामांमध्ये अपयशाचा ठपका ठेवत जोरदार आंदोलन केले, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाने दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळत प्रत्युत्तर दिले.
बुधवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता नगर परिषद कार्यालय परिसरात भाजप नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने ‘एप्रिल फूल’ आंदोलन केले. सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी मागील चार महिन्यांत एकही ठोस विकासकाम झाले नसल्याचा आरोप केला आणि नागरिकांना सतत “एप्रिल फूल” बनवले जात असल्याचा दावा केला. यावेळी मुख्याधिकारी कार्यालयात ‘एप्रिल फूल बनाया’ हे गाणे वाजवून प्रतीकात्मक निषेध नोंदवण्यात आला तसेच निवेदन देण्यात आले.
भाजप नगरसेवकांच्या मते, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे 6 कोटी रुपयांचा विकास निधी परत गेला आहे. शहरातील आरओ यंत्रणा बंद आहेत, पथदिवे निकामी झाले आहेत, हँडपंप दुरुस्ती प्रलंबित आहे आणि स्वच्छता व्यवस्था ढासळली आहे. तसेच नियमित मासिक बैठका होत नसल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, 30 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. हे आंदोलन “दिशाहीन आणि नागरिकांना दिशाभूल करणारे” असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सत्ता असतानाही भाजप स्थानिक पातळीवर केवळ राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
पलटवार करताना सत्ताधाऱ्यांनी शहरातील काही ठिकाणी शासकीय जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला. तसेच काही प्रकल्पांचा व्यावसायिक वापर होत असल्याचे सांगत शासन आणि नागरिकांना “एप्रिल फूल” बनवले जात असल्याचा दावा केला.
पत्रकार परिषदेत हेही स्पष्ट करण्यात आले की अनेक समस्या या मागील कार्यकाळातील आहेत, ज्यावर टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. अमराई आणि उडिया मोहल्ला परिसरातील बंद पडलेल्या सार्वजनिक सुविधा दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले असून शहरात सिमेंट काँक्रीट नाल्यांचे बांधकामही सुरू झाले आहे.
मुख्याधिकारी निलेश रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1 कोटी रुपयांच्या विकासकामांची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करण्यात आला. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या 5 पाण्याचे टँकर सुरू असून त्यात वाढ करण्याची योजना आहे. तसेच कचरा संकलन व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सत्ताधाऱ्यांनी हेही मान्य केले की शहराची जुनी पाणीपुरवठा योजना जिर्ण झाली असून वारंवार पाइपलाइन फुटण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून नव्या जलयोजनेवर काम सुरू करण्यात आले आहे.
उड्डाणपूल, WCL परिसरातील स्वच्छता व प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित विभागांसोबत बैठका झाल्याचे सांगण्यात आले असून 15 ते 20 दिवसांत ठोस निर्णय अपेक्षित असल्याचेही नमूद करण्यात आले.
एकूणच, ‘एप्रिल फूल’ आंदोलनामुळे घुग्घुसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक नगर परिषदेला अपयशी ठरवत असताना सत्ताधारी पक्ष हे केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगत विकासकामांबाबत आपली बांधिलकी व्यक्त करत आहे. येत्या काळात या राजकीय संघर्षाचा शहराच्या प्रत्यक्ष विकासावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



