ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिशक्ती अभियानात पोळसा ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराची शक्ती

महिला सक्षमीकरण, बालविकास व ग्रामविकासातील उत्कृष्ट कार्याची राज्य शासनाकडून दखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या आदिशक्ती अभियान पुरस्कार २०२५-२६ मध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील पोळसा ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर मानाचा सन्मान मिळविला आहे. महिला व बाल विकास क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, महिला सक्षमीकरणासाठी राबविलेले उपक्रम, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले पुढाकार, तसेच ग्रामपंचायतीचे प्रभावी प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर पोळसा ग्रामपंचायतीने हा बहुमान मिळविला आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदिशक्ती अभियानातील पुरस्काराच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यात पोळसा ग्रामपंचायतीला प्रथम, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ग्रामपंचायतीला द्वितीय तर वरोरा तालुक्यातील आनंदवन ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या अधिकृत निर्णयात या ग्रामपंचायतींच्या कार्याची नोंद करण्यात आली आहे.

पोळसा ग्रामपंचायतीने महिला व बाल विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, सामाजिक जनजागृती, स्वच्छता, पोषण, आरोग्य आणि सर्वसमावेशक ग्रामविकास या क्षेत्रांत सातत्याने केलेल्या कामाची ही राज्यस्तरीय पोचपावती मानली जात आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पुरस्कारामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून, इतर ग्रामपंचायतींसाठीही पोळसा ग्रामपंचायतीचे कार्य प्रेरणादायी ठरणार आहे. राज्य शासनाकडून मिळालेला हा सन्मान केवळ पोळसा ग्रामपंचायतीचाच नसून संपूर्ण गोंडपिंपरी तालुका आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

*राबविण्यात आलेले उपक्रम*

महिला व बालकल्याणला केंद्रस्थानी ठेऊन महिलांचे सक्षमीकरण, माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना, शंभर टक्के लसीकरण, कुपोषणमुक्त गाव, नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, गर्भवती व स्तनदा मातांची तपासणी, किशोरी आरोग्य जनजागृती तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदेशीर माहिती व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये