“आकांक्षित तालुका” कार्यक्रमातून विकासाची “नवी आशा..!”
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची ऐतिहासिक संधी ; जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
राज्यातील विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात मागे राहिलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण, संतुलित आणि गतिमान विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम २०२६-२७’ राबविण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णयानुसार राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व आदिवासी भागाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याची संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार विकासकामे हाती घेत नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
राज्य शासनाने १७७ आकांक्षित तालुक्यांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले असून, यासाठी एकूण ८८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून आरोग्य, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास, पिण्याचे पाणी, रस्ते, डिजिटल सुविधा, महिला व बालकल्याण तसेच इतर मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये दर्जात्मक सुधारणा करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. निधीपैकी किमान ४० टक्के निधी आरोग्य, पोषण आणि शिक्षण या घटकांवर खर्च करायचा असून, दुहेरी निधी वितरण टाळण्यासाठीही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमांतर्गत आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांतील कामगिरीचे नीती आयोगाने निश्चित केलेल्या निर्देशांकांच्या आधारे सातत्याने मूल्यमापन करण्यात येणार आहे. विकासाची स्पर्धा निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना आकर्षक प्रोत्साहनपर निधीही जाहीर करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा निर्णय विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार शासकीय सेवा, भक्कम पायाभूत सुविधा, सुधारित आरोग्य व शिक्षण व्यवस्था, आधुनिक कृषी सुविधा आणि रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला निश्चितच नवी गती मिळणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे
*जिल्ह्यातील “या” नऊ तालुक्यांचा समावेश*
जिल्ह्यातील चिमूर, गोंडपिपरी, जिवती, सावली, नागभिड, राजुरा, मूल, पोंभुर्णा आणि सिंदेवाही या नऊ तालुक्यांचा आकांक्षित तालुका कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून, यामुळे या तालुक्यांना विशेष विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*पुरस्काराचे स्वरूप*
क्षेत्रनिहाय सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच तालुक्यांना अनुक्रमे १० कोटी, ८ कोटी, ६ कोटी, ४ कोटी आणि ३ कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. तर सर्व क्षेत्रातील एकत्रित कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या तीन तालुक्यांना १५ कोटी, १३ कोटी आणि ११ कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
*समित्या करणार अंमलबजावणी*
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार असून, निधीचा नियोजनबद्ध वापर, विकासकामांचे सातत्याने परीक्षण, विविध विभागांचा समन्वय आणि विकास निर्देशांकात सुधारणा करण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविण्यात आली आहे.



