गवराळ्यात पंचमुखी हनुमान मंदिराची दानपेटी फोडली
आरोपींचा अद्याप सुगावा नाही : गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील गवराळा येथील पंचमुखी हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक स्थळावर झालेल्या या प्रकारामुळे भक्तगणांमध्ये तीव्र संताप व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी प्रशांत मनोहर कारेकर यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मेजर पठाण हे पुढील तपास करीत आहेत.
घटनास्थळी पंचनामा केला असता मंदिरातील अवजड लोखंडी दानपेटी फोडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दानपेटीचे स्वरूप व ती फोडण्याची पद्धत पाहता या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक आरोपी सहभागी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेला काही काळ उलटूनही आरोपींचे धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत.
दरम्यान, वरद विनायक मंदिर परिसरात अलीकडच्या काळात टवाळखोरांचा वावर वाढल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत काही युवक सिगारेट, मद्य तसेच गांजाचे सेवन करत परिसरात वावरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्य धोक्यात येत असून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंदिर परिसरासह सर्व धार्मिक स्थळांवर नियमित गस्त वाढवावी, हुल्लडबाज व समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी भक्तगण व परिसरातील नागरिकांनी केली आहे.



