गोजोली मक्ता येथे ‘पट्टा पद्धती’च्या धान रोवणीची यशस्वी चळवळ
सहाय्यक कृषी अधिकारी निकोडे यांचा अफलातून प्रयोग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
खरीप हंगाम २०२६ मध्ये २९ जुलै रोजी झालेल्या समाधानकारक पावसानंतर गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान रोवणीच्या कामांना वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर गोंडपिपरी तालुका कृषी विभागाने आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेच्या यशामागे सहाय्यक कृषी अधिकारी आर. डी. निकोडे यांचे अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न विशेषत्वाने दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि सातत्याने संवाद साधत त्यांनी गोजोली मक्ता परिसरात ‘पट्टा पद्धती’ची धान रोवणी लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
तालुका कृषी अधिकारी मा. एस. जी. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मंडळ कृषी अधिकारी मा. के. एम. टोंगलवार यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी श्री. आर. डी. निकोडे हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून आधुनिक धान लागवड तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत. त्यांच्या अथक मेहनतीतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोजोली मक्ता गावातील शेतशिवारात पट्टा पद्धतीची धान रोवणी मोठ्या जोमाने राबविण्यात येत असून, या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक लागवडीपेक्षा या पद्धतीत पूर्व-पश्चिम दिशेने ६० ते ९० सेंटीमीटर रुंदीचे पट्टे ठेवले जात असल्याने पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, तुडतुडे नियंत्रणात राहतात तसेच खत व फवारणीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. परिणामी साधारण १८ ते २० फुटव्यांऐवजी ४० ते ४८ फुटवे विकसित होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता निर्माण होते.
दरम्यान, गोंडपिपरी तालुका कृषी विभागाने खरीप पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती देत सर्व पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन तातडीने पीक विमा भरावा, असे आवाहन केले आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पीक उत्पादन वाढीसाठी सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. आर. डी. निकोडे यांच्या अथक परिश्रमांना शेतकऱ्यांकडून मोठी दाद मिळत असून, गोजोली मक्ता परिसरात कृषी विभागाच्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. तालुका कृषी विभागाच्या या प्रयत्नांमुळे आधुनिक शेतीचा नवा आदर्श निर्माण होत असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीकडे टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.



