सर्पदंशाने सगणापूरच्या युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील मौजा सगणापूर येथील २२ वर्षीय युवा शेतकरी शुभम बाबाराव पोले यांचा शेतीची कामे करत असताना झालेल्या सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सगणापूर परिसरात शोककळा पसरली असून पोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पोले हे आपल्या शेतात नियमित शेतीची कामे करत असताना विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शुभम हे मेहनती, कष्टाळू आणि होतकरू युवा शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात शेतीची कामे करताना सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांची गरज अधोरेखित होत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेऊन शासनाने सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शुभम पोले यांच्या कुटुंबाला शासनाच्या लागू असलेल्या मदत योजनेंतर्गत तातडीने आर्थिक सहाय्य मंजूर करावे, तसेच संबंधित विभागाने प्रकरणाची त्वरित चौकशी करून पात्रतेनुसार मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



