वसुधा पोटे यांच्या ४० वर्षांच्या शैक्षणिक सेवेला भावपूर्ण निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिक्षण क्षेत्रातील चार दशकांची अखंड, निष्ठावान व विद्यार्थीकेंद्री सेवा संपली असली तरी वसुधा पोटे यांनी आपल्या कार्यातून उभा केलेला आदर्श व प्रेरणादायी वारसा नव्या पिढीतील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार प्राचार्य लोहे यांनी काढले. जिल्हा परिषद हायस्कूल, विहीरगाव येथे दि. ३१ जुलै रोजी शिक्षिका वसुधा पोटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुल्हाने होते. यावेळी सरपंच विनय खेडेकर, प्राचार्य लोहे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील वढाई, इर्शाद शेख, परशुराम वाघमारे, अश्विनी येवले, स्नेहा झाडे, विनोद भोंगळे, वसुधा पोटे, वसंत पोटे व मनीषा धवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षिका तसेच विद्यार्थिनी परी येळमुळे, गुंजन चहांकर आणि दिव्या काळे यांनी मनोगत व्यक्त करत वसुधा पोटे यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना वसुधा पोटे म्हणाल्या की, सिंदेवाही तालुक्यातील पावनपार या छोट्याशा गावातून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली. सेवाकाळात अनेक अडचणी व आव्हाने आली, मात्र विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य यालाच नेहमी सर्वोच्च प्राधान्य दिले. चार दशकांच्या सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचे समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच साईबाबा ज्युनिअर कॉलेज, विहीरगाव यांच्या वतीने वसुधा पोटे व वसंत पोटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा झाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी झाडे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



