वर्धा पोलिसांचा ‘ड्रग्ज फ्री वर्धा’ जनजागृती अभियानाला प्रारंभ
वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : अमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने ‘ड्रग्ज फ्री वर्धा’ या व्यापक जनजागृती अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत फेब्रुवारी 2027 ते जून 2027 या कालावधीत शाळा, महाविद्यालये, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
अभियानाची सुरुवात फेब्रुवारी 2027 मध्ये युवा जागृती कार्यक्रमाने होणार असून एनएसएस, एनसीसी व युवक मंडळांच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य आणि ‘Say No To Drugs’ विषयावरील चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
मार्च 2027 मध्ये ‘आरोग्यदायी जीवनशैली’ या संकल्पनेवर आधारित क्रीडा स्पर्धा, योग शिबिरे तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीविषयी जनजागृती केली जाणार आहे. एप्रिल 2027 मध्ये व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव कथन, मार्गदर्शन सत्रे आणि सन्मान कार्यक्रम आयोजित केले जातील.
मे 2027 मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन अभियानाचा आढावा घेतला जाणार असून जून 2027 मध्ये राज्यस्तरीय घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याबरोबरच गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का (MCOCA) अंतर्गतही कारवाई करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थांच्या अवैध विक्री व साठ्याबाबत नागरिकांनी गोपनीय माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांच्या सहभागातून ‘ड्रग्ज फ्री वर्धा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून, विशेषतः युवकांनी या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी केले आहे.



