ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाळ्यातही पोंभुर्णा शहराचा तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; नागरिक हैराण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : पावसाळ्यात सलग पाऊस सुरू असतानाही पोंभुर्णा शहरातील पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह नागरिकांची मोठी धावपळ सुरू असून शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगर प्रशासनाने पोंभूर्णा येथील जलस्रोतावरील गाळ उपशाचे काम हाती घेतल्याने सलग दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शहरातील जुना बाजार चौकमध्ये व घाटकुळवरून पोंभुर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला भीमणी गावाजवळ गळती झाल्याने रविवारीही पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. परिणामी शहरातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

सध्या परिसरात धान रोवणीची कामे जोरात सुरू आहेत. महिलांना सकाळी लवकर शेतात रोवणीसाठी जावे लागत असल्याने त्यापूर्वी घरासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. सलग तीन दिवस नळांना पाणी न आल्याने घरगुती कामे विस्कळीत झाली असून शेतीची कामे करणाऱ्या महिलांना विशेष मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांना खासगी पाण्याच्या स्रोतांवर किंवा विहिरींवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

सामान्यता जलस्रोतातील गाळ उपशाची कामे उन्हाळ्यात पूर्ण केली जातात, जेणेकरून पावसाळ्यात पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये. मात्र, सलग पाऊस सुरू असतानाच गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आल्याने तसेच त्यानंतर मुख्य जलवाहिनीला गळती झाल्यामुळे नगर पंचायतच्या नियोजनाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जलवाहिनीची गळती तातडीने दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पोंभूर्णा जलस्रोतातील गाळ उपशाचे काम आणि भीमणीजवळील मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

– दर्शन गोरटीवार, सभापती, पाणीपुरवठा समिती, नगर पंचायत पोंभूर्णा

जलस्रोतातील गाळ उपशाची कामे सामान्यतः उन्हाळ्यात केली जातात. पावसाळ्यात सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिक, विशेषतः धान रोवणी करणाऱ्या महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर प्रशासनाने तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल.

-आशिष कावटवार, विरोधी पक्षनेता, नगर पंचायत पोंभूर्णा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये