ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट 

उपचारांच्या नावाखाली भरमसाठ औषधे देऊन रुग्णांची लुट ; आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात अनुभवाच्या भरोश्यावर बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडले असून, उपचारांच्या नावाखाली रुग्णांची ससेहोलपट करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. भरमसाठ औषधे, सलाईन आणि इंजेक्शन देऊन रुग्णांकडून लूट चालविली जात असल्याचा प्रकार बघायला मिळत असुन आरोग्य विभागाने याची दखल घेत बोगस डॉक्टरांवर लगाम लावतील काय? असा सवाल आता सर्वसामान्य माणूस विचारू लागला आहे.

           जिवती शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे अनधिकृत दवाखाने सक्रिय आहेत. येथील ग्रामीण भागातील गरीब आणि साधारण रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी पर्याय नसल्याने ते या बोगस डॉक्टरांकडे वळतात.यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे, जिवती शहरात ग्रामीण रुग्णालयाची इमारत तयार झाली असून उद्घाटनही झाले आहे. मात्र, या रुग्णालयात उपचारांसाठी आवश्यक उपकरणे, औषधसाठा आणि इतर साहित्य यांची पूर्तता झालेली नाही. पदभरतीही अपुरी असल्याने केवळ उसनवारीच्या आधारावर रुग्णालय चालविले जात आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार आणि तातडीचे उपचार मिळणे कठीण झाले आहे.ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, नर्स, आवश्यक उपकरणे आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना चांगले उपचार मिळतील आणि बोगस डॉक्टरांच्या अवैध व्यवसायाला मोठा आळा बसणार असून तालुक्यातील विविध गावांमध्ये अनधिकृतपणे चालणारे बोगस दवाखाने बंद करण्यासाठी आरोग्य विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरावर बोगस डॉक्टर आणि अनधिकृत नर्सिंग होम्सविरुद्ध टास्क फोर्स गठित केल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, जिवतीसारख्या दुर्गम भागातही ही मोहीम प्रभावीपणे राबविली जावी, अशी मागणी तालुक्यातील नागरीकांनी केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरु असताना आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

                           ° संतोष इंद्राळे, जिवती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये