ग्रामजयंती निमित्ताने नागपूर श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर
३० एप्रिल रोजी पुरस्काराचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीगुरुदेव सेवा मंडळ नागपूरच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सन्मान म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार तसेच कला, साहित्य, सेवा, कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्रीगुरुदेव सेवाश्रम, नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये राष्ट्रसंत विचार प्रसार सेवा पुरस्कार (शहर विभाग) श्री . आकाश निस्ताने, नागपूर यांना, तर ग्रामीण विभागासाठी श्री पुरषोत्तम बैसकार, यवतमाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रसंत साहित्य विचार प्रसार सेवा पुरस्कार (संस्था – शहर विभाग) राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, चंद्रपूर यांना, तसेच संस्था – दुर्गम भाग विभागासाठी श्रीगुरुदेव व्यायाम शिक्षण व सेवा मंडळ, गडचिरोली यांना जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात देशभक्त वामनराव गावंडे स्मृती पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संध्या राजूरकर (दैनिक बहुजन सौरभ – निवासी संपादक) यांना, तर पत्रकार श्याम लोहबरे स्मृती पुरस्कार श्री अनिल शोभा फेकरीकर (तरुण भारत – शहर संपादक) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीतरत्न अन्नाजी माहुलकर स्मृती पुरस्कार श्री . प्रमोद पोकळे, बडनेरा (प्रयोगशील संगीतकार) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार-आदर्श ग्रामपंचायत कवठा (म्हसाळा) यांना देण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारार्थींनी आणि श्री गुरुदेव प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे दिलीप सुरकार गुरुजी नागपूर यांनी केले आहे.



