खैरी येथे होणारा बालविवाह प्रशासनाच्या प्रयत्नाने थांबविण्यात आला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २०.०४.२०२६ रोजी खैरी गावात अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगावखैरी येथे होणारा बालविवाह प्रशासनाच्या प्रयत्नाने थांबविण्यात आला येथील अल्पवयीन बालिकेचा विवाह खैरी येथील २४ वर्षीय युवका सोबत ठरविण्यात आला होता. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासन व चाईल्ड हेल्पलाईन यांना मिळताच त्वरित पथक घटनास्थळी दाखल झाले.

पथकात महिला व बाल विकास विभागाच्या, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, पोलीस विभाग, स्थानिक प्रशासन यांचा समावेश होता. संबंधित कुटुंबियांना पोलीस स्टेशन खरांगाना येथे बोलावून ग्रामपंचायत अधिकारी तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी संदीप खोडे यांच्या मार्फत पालकांकडून बालविवाह थांबविण्याबाबतचा जबाबनामा लिहून घेण्यात आला. यावेळी सक्षम अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, अंगणवाडी सेविका मंगला भानसे, पोलीस पाटील मंगेश बावणे, चंदा नाखले, , संतोष डोणे, मधुरी थूल, वैभव भांदककर उपस्थित होते, तसेच बालिका बाभूळगाव येथील असल्यामुळे तातडीने ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती दीपा शिंदे याच्या सोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली व प्रतिबंधात्मक कार्यवाही करिता बालिकेच्या कुटुंबियांकडून बालविवाह थांबविण्याच्या जबाबनामा लिहून घेऊन त्यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. चाईल्ड हेल्प लाईन वर्धा चे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक याच्या मार्फत कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशीर परिणाम यांची माहिती देण्यात आली. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनाच्या समजावणीमुळे कुटुंबीयांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शवली. यानंतर बालिकेच्या शिक्षण व सुरक्षिततेस प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालिकेला बाल कल्याण समिती वर्धा येथे हजर करण्याचे पालकांना सूचना देण्यात आलेल्या असून पुढील कार्यवाही बाल कल्याण समिती वर्धा मार्फत करण्यात येईल. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी सतत जनजागृती करून चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा मा. तृप्ती चव्हाण यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांच्या समन्वयाने पार पडली.



