रॉयल्टीलाठी, तोहोगांवची आणि गोंडपिपरीत मुरूम फस्त
महसूल विभागाच्या नाकाखाली तस्करांचा टाईम गेम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर जिल्यातील गोंडपिपरी तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक आणि रॉयल्टीची चोरी हा प्रकार नवा नाही, मात्र आता मुरूम तस्करांनी महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत एक नवी शक्कल लढवली आहे. तोहगाव आणि लाठी येथील रॉयल्टीचा वापर करून गोंडपिपरी शहरात मुरूम फस्त करण्याचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, यात महसूल विभागाचे अधिकारी ढिम्म भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील व्यंकटपूर शिवारातील सर्वे क्रमांक १६२ मधून मुरूम खोदण्यासाठी भालचंद्र बोधलकर नावाच्या व्यक्तीने १०० ब्रासची रॉयल्टी काढली होती. मात्र, ही रॉयल्टी काढताना तांत्रिक खेळी खेळण्यात आली. ही रॉयल्टी तोहगाव आणि लाठी या दूरच्या गावांसाठी दाखवण्यात आली. नियमानुसार, लांबच्या अंतरासाठी रॉयल्टीवर साधारणतः दोन तासांचा अवधी मिळतो. याच दोन तासांच्या वाढीव वेळेचा गैरफायदा घेत गोंडपिपरी शहरात अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर एकाच रॉयल्टीवर ५ ते ६ फेऱ्या (ट्रिप) मारल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
तस्करांनी ‘टाईम मॅनेजमेंट’चा असा काही वापर केला की, कागदोपत्री १०० ब्रासची रॉयल्टी असताना प्रत्यक्ष आष्टी चंद्रपूर मार्गावरील चिंतामणी कॉलेज जवळील लेआउटवर व गोंडपिपरी शहरात ५०० ते ६०० ब्रास मुरूम टाकण्यात आला आहे.लाठी,तोहगावची रॉयल्टी दाखवून गोंडपिपरीच्या जवळच्या लेआउटवर मुरूम रिकामी करणे आणि पुन्हा त्याच वेळेत दुसरी खेप भरणे, असा हा गोरखधंदा सुरू होता . जर या लेआउटवर व शहरात जाऊन प्रत्यक्ष मोजमाप केले आणि तिथल्या मुरुमाच्या साठ्याची पडताळणी केली, तर हा मोठा घोटाळा समोर येऊ शकतो.
एकीकडे सामान्य माणसावर किरकोळ कारणावरून दंडात्मक कारवाई करणारा महसूल विभाग इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अवैध उत्खननाकडे डोळेझाक का करत आहे? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
*खड्ड्यांचे मोजमाप होणार का.?*
ज्या ठिकाणाहून मुरूम काढला गेला, त्या गड्ड्यांचे मोजमाप केल्यास किती ब्रास उपसा झाला हे स्पष्ट होईल.
*लेआउटची तपासणी होणार का?*: गोंडपिपरी शहरातील व ज्या लेआउटवर हा मुरूम टाकला गेला, तिथल्या मालकांकडे टीपी (Transit Pass) ची मागणी केली तर रॉयल्टीचा घोळ उघड होईल.
*हितसंबंधांची चर्चा*
मुरूम तस्कर आणि महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याशिवाय इतका मोठा प्रकार घडणे अशक्य आहे, अशी चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. जर महसूल विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली नाही आणि संबंधित लेआउटवर किंवा शहरात जाऊन पडताळणी केली नाही, तर हे प्रकरण दाबले जाण्याची दाट शक्यता आहे.
*आता कारवाईकडे लक्ष*
आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित तस्करावर कठोर कारवाई करणार की गौण खनिजाची ही लूट अशीच सुरू राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जर कारवाई झाली नाही, तर महसूल विभाग आणि मुरूम तस्करांचे हितसंबंध असल्याचे शिक्कामोर्तब होईल, हे मात्र निश्चित.



